मराठी रंगभूमी आणि नाट्यसंगीताच्या क्षेत्रात सुवर्णयुग निर्माण करणारे नारायण श्रीपाद राजहंस , अर्थात बालगंधर्व यांचा जीवनपट उलगडून दाखवणा-या ‘ बालगंधर्व ’ या मराठी चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर यंदाच्या कान्स इटंरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार आहे.
बालगंधर्व युग सुरू होऊन १०० वर्षं पूर्ण होत असतानाच प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई आणि दिग्दर्शक रवी जाधव या जोडीनं त्यांच्या जीवनावर आधारित ‘ बालगंधर्व ’ या चित्रपटाच्या निर्मिती केली आहे. सुबोध भावेनं यात बालगंधर्वांची भूमिका साकारली आहे, तर संगीताची धुरा कौशल इनामदार यांनी सांभाळली आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये बालगंधर्वच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. आता हा चित्रपट पूर्ण झाला असून ‘ चंद्रकांत प्रॉडक्शन ’ च्या या भव्यदिव्य उपक्रमाचा प्रीमिअरही तितकाच भव्यदिव्य असणार आहे. यंदाच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
बालगंधर्वांनी मराठी रंगभूमीला प्रचंड योगदान दिलंय. त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठीच आपण या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘ बालगंधर्व ’ ची भव्यता पाहून अनेक जण स्तीमित झालेत आणि आता ‘ कान्स ’ मध्ये प्रीमिअर झाल्यानंतर भारतीय सिनेमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचं स्थान मिळेल, असा विश्वास नितीन देसाई यांनी व्यक्त केला. कान्सशिवाय, व्हेनिस, बर्लिन, टोरांटो इथंही हा चित्रपट दाखवणार असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं.
येत्या ६ मे रोजी बालगंधर्व भारतात प्रदर्शित होतोय.