Sunday, April 10, 2011

संस्कृती कलादर्पण पुरस्कार प्रदान


गेल्या दहा वर्षापासून अथक प्रयत्नाने संस्कृती कलादर्पणचे चंद्रशेखर सांडवे हे संस्कृती कलादर्पण पुरस्कार सोहळा आयोजित करत आहेत. यंदा पहिल्यांदाच हा सोहळा ठाण्यात आयोजित करण्यात आला. पन्नास वर्षाहून अधिक काळ हिंदी, मराठी चित्रपट, नाटक व मालिकांमध्ये कार्यरत असलेले ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांना यंदाच्या कलागौरव पुरस्काराने गौरवण्यात आले

 माझ्या घरच्या मैदानात माझा मित्र बाळ धुरी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना आनंद होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. संस्कृती कलादर्पणच्या वतीने देण्यात येणारा समाजगौरव पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका आणि महाराष्ट्राची आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुताई सपकाळ यांना देण्यात आला. जीवनात येणा-या काटय़ांवर मात करत आपण गरुडझेप घेतली पाहिजे, अशी भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली.

या कार्यक्रमाची सुरुवात झाली ती ‘मोरया मोरया..’ या गीतावर सादर करण्यात आलेल्या नृत्याने. त्यामुळे पुरस्कार सोहळ्यात छान माहौल तयार झाला. प्रसाद ओकने आपल्या निवेदनाची सुरुवात केली तीच ‘मी चारित्र्यसंपन्न प्रसाद ओक बोलतोय’ या वाक्याने. त्यावर प्रेक्षकांमधून सूचक हास्याची एक लकेर उमटली.

अरगडे पाटील यांच्या हस्ते तांत्रिक पुरस्कार प्रदान केल्यानंतर किशोर चौघुले आणि सुप्रिया पाठारे यांनी सादर केलेल्या भविष्याची रनिंग कॉमेट्री या प्रहसनालाही प्रेक्षकांनी दिलखुलास दाद दिली. आपल्याच व्यवसायावर त्यांनी दिलेल्या कोपरखळ्या चांगल्याच मनोरंजक होत्या. प्रहसनाच्या या गुंगीत असतानाच रंगमंचावर सादर करण्यात आली ती महाराष्ट्राची लावणी, किशोरी शहाणे यांनी सादर केलेल्या ‘सातारा सांगली देखो..’ या त्यांच्यावरच चित्रित झालेल्या गीतावरच्या या नृत्याने कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला.

भार्गवी चिरमुले यांनी सादर केलेल्या ‘तुमची नजर साधी नाही..’ या लावणीला तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या दोघींनी सादर केलेल्या लावण्यांची एक अनोखी जुगलबंदी पाहायला मिळाली. ‘अगबाई अरेच्चा’ या चित्रपटातल्या पिरीयड पॅरेडी गीतावरच्या सुशांत शेलार, पूर्वा पवार यांच्या नृत्यालाही प्रेक्षकांची मनापासून दाद मिळाली. तृप्ती भोईर यांनी ‘अगडबम’ या त्यांच्या चित्रपटातले गीत सादर करून या चित्रपटासाठी मिळालेल्या साहाय्यक अभिनेत्री आणि रंगभूषेचा पुरस्कार किती रास्त आहे, याची जणू साक्षच दिली. अनेक कलाकारांच्या आणि नृत्यांगणांच्या कार्यक्रमावर चार चाँद लावले ते सिद्धार्थ जाधव याने सादर केलेल्या ‘झिंगलाय झिंगलाय..’ या गीतावरच्या नृत्याने. त्याने रंगमचावर एण्ट्री केली तीच मुळी सायकलवरून. त्याच्या या एण्ट्रीलाही जबरदस्त दाद मिळाली. त्याच्या या नृत्यानेच या कार्यक्रमाची सांगता झाली. आपल्या या सांस्कृतिक संध्याकाळच्या तृप्त मेजवानीनंतर सर्वच रसिक अधिक उत्साहाने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले. एक अविस्मरणीय सोहळा अनुभवल्याचे समाधान त्यांच्या चेह-यावर दिसत होते.

चित्रपट विभाग
सर्वोत्कृष्ट चित्रपटः रामचंद्र पुरुषोत्तम जोशी, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन :अजय फणसेकर (रामचंद्र पुरुषोत्तम जोशी), सर्वोत्कृष्ट अभिनेता : मोहन जोशी (डेबू तोचि देव जाणावा), अभिनेत्री :  सोनाली कुलकर्णी (रिंगा रिंगा), साहाय्यक अभिनेता : प्रसाद ओक (ती रात्र), साहाय्यक अभिनेत्री : सीमा देव (जेता), लक्षवेधी अभिनेत्री : तृप्ती भोईर (अगडबम), अभिनेता : मोहन आगाशे (कोण आहे रे तिकडे), कथा : मधु मंगेश कर्णिक (निर्माल्य), पटकथा : अजय फणसेकर (रामचंद्र पुरुषोत्तम जोशी), संवाद : जनमेजय पाटील, स्वप्नील जाधव (धो धो पावसातली वन डे मॅच), गीतरचना : विजू माने (ती रात्र), पार्श्वगायन : अजित कडकडे (डेबू तोचि देव जाणावा), पार्श्वगायिका : वैशाली सामंत, बेला शेंडे (डेबू तोचि देव जाणावा), संगीत : आनंद मोडक (उमंग),  पार्श्वसंगीत : माधव आजगावकर (निर्माल्य), कलादिग्दर्शन : गजानन चौखंडे (डेबू तोचि देव जाणावा), संकलन : राजेश राव (तेंडुलकर आऊट), छायांकन : संजय जाधव (रिंगा रिंगा), बालकलाकार : प्रिन्स बोरा (उमंग), रंगभूषा : अनिल प्रेमगिरीकर (अगडबम), वेशभूषा : अंजली खोबरेकर (हंगामा), नृत्यदिग्दर्शन : उमेश जाधव (रिंगा रिंगा)

नाटक विभाग
सर्वोत्कृष्ट नाटक : काटकोन त्रिकोण, दिग्दर्शक : समीर विध्वंस (नवा गडी नवं राज्य), सर्वोत्कृष्ट अभिनेता : उमेश कामत, अभिनेत्री: अदिती सारंगधर (एक लफडं विसरता न येण्यासारखं), साहाय्यक अभिनेताः समीर खांडेकर (मीटर डाऊन), साहाय्यक अभिनेत्री : मृणाल चेंबूरकर (काय डेंजर वारा सुटलाय), विनोदी अभिनेता : किशोर चौघुले (रामनगरी), विनोदी अभिनेत्री : पौर्णिमा अहिरे (रामनगरी), लेखक : विवेक बेळे (काटकोन त्रिकोण), प्रकाश : सौरभ शेठ (इथे गवतास भैय्ये फुटतात), नेपथ्य: प्रसाद वालावलकर (नवा गडी नवं राज्य), रंगभूषा : शशिकांत सपकाळ (शिवबा), संगीत : अच्युत ठाकूर (महाराष्टाचं चांगभलं), पार्श्वसंगीत : नरेंद्र भिडे (काटकोन त्रिकोण), वेशभूषा : शैलजा शिंदे (महाराष्ट्राचं चांगभलं), लक्ष्यवेधी नाटक : महाराष्ट्राचं चांगभलं, विनोदी नाटक : रामनगरी

मालिका विभाग
सर्वोत्कृष्ट टीव्ही मालिका : श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी ई टीव्ही, दिग्दर्शन : महेश तागडे, अजय मयेकर (लेक लाडकी या घरची ई टीव्ही), सर्वोत्कृष्ट अभिनेता : अंगद म्हसकर (श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी ई टीव्ही), अभिनेत्री : तेजा देवकर (वृंदावन मी मराठी टीव्ही), कथा : शिरीष लाटकर (वृंदावन मी मराठी टीव्ही), छायांकन : योगेश जानी (श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी ई टीव्ही), टीव्ही मालिका : ही वाट दूर जाते

विशेष पुरस्कार
विशेष सामाजिक चित्रपट : मी सिंधुताई सपकाळ, विशेष चित्रपट : रमाई, विशेष ग्रामीण चित्रपट : लक्ष्मी येई घरा, विनोदी चित्रपट : हंगामा, विशेष लक्षवेधी चित्रपट : करुया उदयाची बात, लक्षवेधी दिग्दर्शक :    निलेश जळमकर (डेबू देव तोचि जाणावा)

न्यूज चॅनल विभाग
सर्वोत्कृष्ट न्यूज चॅनेल : स्टार माझा, मुलाखतकार : अमित भंडारी (स्टार माझा), सूत्रधार : माधुरी निकुंभ (आयबीएन लोकमत), कथाबाह्य मालिका : अराऊंड द वर्ल्ड (झी चोवीस तास)  

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...