Sunday, April 10, 2011

संस्कृती कलादर्पण पुरस्कार प्रदान


गेल्या दहा वर्षापासून अथक प्रयत्नाने संस्कृती कलादर्पणचे चंद्रशेखर सांडवे हे संस्कृती कलादर्पण पुरस्कार सोहळा आयोजित करत आहेत. यंदा पहिल्यांदाच हा सोहळा ठाण्यात आयोजित करण्यात आला. पन्नास वर्षाहून अधिक काळ हिंदी, मराठी चित्रपट, नाटक व मालिकांमध्ये कार्यरत असलेले ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांना यंदाच्या कलागौरव पुरस्काराने गौरवण्यात आले

 माझ्या घरच्या मैदानात माझा मित्र बाळ धुरी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना आनंद होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. संस्कृती कलादर्पणच्या वतीने देण्यात येणारा समाजगौरव पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका आणि महाराष्ट्राची आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुताई सपकाळ यांना देण्यात आला. जीवनात येणा-या काटय़ांवर मात करत आपण गरुडझेप घेतली पाहिजे, अशी भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली.

या कार्यक्रमाची सुरुवात झाली ती ‘मोरया मोरया..’ या गीतावर सादर करण्यात आलेल्या नृत्याने. त्यामुळे पुरस्कार सोहळ्यात छान माहौल तयार झाला. प्रसाद ओकने आपल्या निवेदनाची सुरुवात केली तीच ‘मी चारित्र्यसंपन्न प्रसाद ओक बोलतोय’ या वाक्याने. त्यावर प्रेक्षकांमधून सूचक हास्याची एक लकेर उमटली.

अरगडे पाटील यांच्या हस्ते तांत्रिक पुरस्कार प्रदान केल्यानंतर किशोर चौघुले आणि सुप्रिया पाठारे यांनी सादर केलेल्या भविष्याची रनिंग कॉमेट्री या प्रहसनालाही प्रेक्षकांनी दिलखुलास दाद दिली. आपल्याच व्यवसायावर त्यांनी दिलेल्या कोपरखळ्या चांगल्याच मनोरंजक होत्या. प्रहसनाच्या या गुंगीत असतानाच रंगमंचावर सादर करण्यात आली ती महाराष्ट्राची लावणी, किशोरी शहाणे यांनी सादर केलेल्या ‘सातारा सांगली देखो..’ या त्यांच्यावरच चित्रित झालेल्या गीतावरच्या या नृत्याने कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला.

भार्गवी चिरमुले यांनी सादर केलेल्या ‘तुमची नजर साधी नाही..’ या लावणीला तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या दोघींनी सादर केलेल्या लावण्यांची एक अनोखी जुगलबंदी पाहायला मिळाली. ‘अगबाई अरेच्चा’ या चित्रपटातल्या पिरीयड पॅरेडी गीतावरच्या सुशांत शेलार, पूर्वा पवार यांच्या नृत्यालाही प्रेक्षकांची मनापासून दाद मिळाली. तृप्ती भोईर यांनी ‘अगडबम’ या त्यांच्या चित्रपटातले गीत सादर करून या चित्रपटासाठी मिळालेल्या साहाय्यक अभिनेत्री आणि रंगभूषेचा पुरस्कार किती रास्त आहे, याची जणू साक्षच दिली. अनेक कलाकारांच्या आणि नृत्यांगणांच्या कार्यक्रमावर चार चाँद लावले ते सिद्धार्थ जाधव याने सादर केलेल्या ‘झिंगलाय झिंगलाय..’ या गीतावरच्या नृत्याने. त्याने रंगमचावर एण्ट्री केली तीच मुळी सायकलवरून. त्याच्या या एण्ट्रीलाही जबरदस्त दाद मिळाली. त्याच्या या नृत्यानेच या कार्यक्रमाची सांगता झाली. आपल्या या सांस्कृतिक संध्याकाळच्या तृप्त मेजवानीनंतर सर्वच रसिक अधिक उत्साहाने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले. एक अविस्मरणीय सोहळा अनुभवल्याचे समाधान त्यांच्या चेह-यावर दिसत होते.

चित्रपट विभाग
सर्वोत्कृष्ट चित्रपटः रामचंद्र पुरुषोत्तम जोशी, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन :अजय फणसेकर (रामचंद्र पुरुषोत्तम जोशी), सर्वोत्कृष्ट अभिनेता : मोहन जोशी (डेबू तोचि देव जाणावा), अभिनेत्री :  सोनाली कुलकर्णी (रिंगा रिंगा), साहाय्यक अभिनेता : प्रसाद ओक (ती रात्र), साहाय्यक अभिनेत्री : सीमा देव (जेता), लक्षवेधी अभिनेत्री : तृप्ती भोईर (अगडबम), अभिनेता : मोहन आगाशे (कोण आहे रे तिकडे), कथा : मधु मंगेश कर्णिक (निर्माल्य), पटकथा : अजय फणसेकर (रामचंद्र पुरुषोत्तम जोशी), संवाद : जनमेजय पाटील, स्वप्नील जाधव (धो धो पावसातली वन डे मॅच), गीतरचना : विजू माने (ती रात्र), पार्श्वगायन : अजित कडकडे (डेबू तोचि देव जाणावा), पार्श्वगायिका : वैशाली सामंत, बेला शेंडे (डेबू तोचि देव जाणावा), संगीत : आनंद मोडक (उमंग),  पार्श्वसंगीत : माधव आजगावकर (निर्माल्य), कलादिग्दर्शन : गजानन चौखंडे (डेबू तोचि देव जाणावा), संकलन : राजेश राव (तेंडुलकर आऊट), छायांकन : संजय जाधव (रिंगा रिंगा), बालकलाकार : प्रिन्स बोरा (उमंग), रंगभूषा : अनिल प्रेमगिरीकर (अगडबम), वेशभूषा : अंजली खोबरेकर (हंगामा), नृत्यदिग्दर्शन : उमेश जाधव (रिंगा रिंगा)

नाटक विभाग
सर्वोत्कृष्ट नाटक : काटकोन त्रिकोण, दिग्दर्शक : समीर विध्वंस (नवा गडी नवं राज्य), सर्वोत्कृष्ट अभिनेता : उमेश कामत, अभिनेत्री: अदिती सारंगधर (एक लफडं विसरता न येण्यासारखं), साहाय्यक अभिनेताः समीर खांडेकर (मीटर डाऊन), साहाय्यक अभिनेत्री : मृणाल चेंबूरकर (काय डेंजर वारा सुटलाय), विनोदी अभिनेता : किशोर चौघुले (रामनगरी), विनोदी अभिनेत्री : पौर्णिमा अहिरे (रामनगरी), लेखक : विवेक बेळे (काटकोन त्रिकोण), प्रकाश : सौरभ शेठ (इथे गवतास भैय्ये फुटतात), नेपथ्य: प्रसाद वालावलकर (नवा गडी नवं राज्य), रंगभूषा : शशिकांत सपकाळ (शिवबा), संगीत : अच्युत ठाकूर (महाराष्टाचं चांगभलं), पार्श्वसंगीत : नरेंद्र भिडे (काटकोन त्रिकोण), वेशभूषा : शैलजा शिंदे (महाराष्ट्राचं चांगभलं), लक्ष्यवेधी नाटक : महाराष्ट्राचं चांगभलं, विनोदी नाटक : रामनगरी

मालिका विभाग
सर्वोत्कृष्ट टीव्ही मालिका : श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी ई टीव्ही, दिग्दर्शन : महेश तागडे, अजय मयेकर (लेक लाडकी या घरची ई टीव्ही), सर्वोत्कृष्ट अभिनेता : अंगद म्हसकर (श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी ई टीव्ही), अभिनेत्री : तेजा देवकर (वृंदावन मी मराठी टीव्ही), कथा : शिरीष लाटकर (वृंदावन मी मराठी टीव्ही), छायांकन : योगेश जानी (श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी ई टीव्ही), टीव्ही मालिका : ही वाट दूर जाते

विशेष पुरस्कार
विशेष सामाजिक चित्रपट : मी सिंधुताई सपकाळ, विशेष चित्रपट : रमाई, विशेष ग्रामीण चित्रपट : लक्ष्मी येई घरा, विनोदी चित्रपट : हंगामा, विशेष लक्षवेधी चित्रपट : करुया उदयाची बात, लक्षवेधी दिग्दर्शक :    निलेश जळमकर (डेबू देव तोचि जाणावा)

न्यूज चॅनल विभाग
सर्वोत्कृष्ट न्यूज चॅनेल : स्टार माझा, मुलाखतकार : अमित भंडारी (स्टार माझा), सूत्रधार : माधुरी निकुंभ (आयबीएन लोकमत), कथाबाह्य मालिका : अराऊंड द वर्ल्ड (झी चोवीस तास)  

Friday, April 8, 2011

धर्मकन्या


स्टार एंटरटेनमेंट मीडिया प्रा.लि.ची मराठी मनोरंजन वाहिनी स्टार प्रवाह आता प्रस्तुत करत आहे प्रणय आणि रहस्याची नवीन कथा - धर्मकन्या. या मालिकेत दोन कुटुंबांमधील कलह आणि त्यामुळे एका तरुणीची होणारी ससेहोलपट याचे चित्रण पाहायला मिळणार आहे.

पिढयान् पिढया धनाढय जमीनदार आणि शक्तीशाली अशा धुरंधर परिवाराचे साम्राज्य येथे चालत आलेले आहे. दोन भाऊ धोंडीराज (दादासाहेब - अशित आंबेकर) आणि भुपेन्दराज (राजासाहेब - गुरूराज अवधनी) हे अनुक्रमे धोंडेवाडी आणि भोपेवाडी येथे आपली सत्ता गाजवत आहेत.

त्यांची आई विद्याताई धुरंधर (संध्याताई म्हात्रे) यांनी असे घोषित केले आहे की त्या हयात असेपर्यंत परिवाराची वारसा हक्काने चालत असलेली संपत्ती कोणालाही देण्यात येणार नाही पण जो ह्या इस्टेटीची चांगली देखभाल करू शकेल त्यालाच ही संपत्ती मिळेल. ह्या सगळया परिस्थितीमध्ये भोपेवाडीच्या हद्दीजवळ प्रिया (खुशबू तावडे) आपले वडिल, म्हातारे शाळामास्तर गजानन जोशी यांच्यासोबत राहत असते. प्रियाला आई नाही आणि तिच्या वडिलांनीच तिला लहानाचे मोठे केलेले आहे. ती आपल्या वडिलांना शाळा चालवण्यासाठी मदत करते. प्रिया अतिशय सुंदर आणि दयाळू स्वभावाची असून वाडीतील ती लाडकी आहे. ती गरीबांना मदत करते आणि सर्व छोटया मुलांची ती ताई आहे.

चंदकांत (राज पाटील) - दादासाहेबांचे दुसरे सुपुत्र प्रियाच्या प्रेमात पडतात आणि त्यामुळे फारच मोठे तणावाचे वातावरण निर्माण होते. राजासाहेबांना प्रियाचे लग्न त्यांच्या पत्नीचा भाचा गोप्याशी लावायचे आहे, जो मानसिकदृष्टया अधू आहे. सर्वांनाच ह्या गोष्टीचा धक्का बसतो पण राजासाहेबांच्या फर्मानापुढे कोणाचेच काही चालत नाही.

ह्या दोन परिवारांच्या तणावामध्ये प्रिया अडकते आणि तिच्याकडे तिच्या स्वत:च्या आत्मसन्मानासाठी आणि तिच्या म्हाताऱ्या वडिलांसाठी लढा देण्यास उभे राहण्यावाचून कुठलाही पर्याय शिल्लक राहत नाही.

विरेन प्रॉडक्शन्सची निमिर्ती, विरेन यांचे दिग्दर्शन असलेल्या धर्मकन्यामध्ये प्रियाच्या भूमिकेत खुशबू तावडे, संदीपच्या भूमिकेत श्रीजित मराठे, दादासाहेब आणि राजासाहेब यांच्या भूमिकेत अनुक्रमे अशित आंबेकर आणि गुरूराज अवधानी आणि विद्याताईंच्या भूमिकेत संध्या म्हात्रे आहेत. मराठी रंगमंच आणि छोट्या पडद्यावरील मातब्बर कलाकार मंडळींसह धर्मकन्या मालिका पाहणे अतिशय रोचक ठरेल.

Thursday, April 7, 2011

ताऱ्यांचे बेट



एकता कपूरचा पहिला मराठी चित्रपट.

मानाचे दोन पुरस्कार प्रदर्शनापूर्वीच पटकावलेला आणि मध्यमवर्गीय कुटुंबाची जगण्यातली गंमत अधोरेखित करणारा ‘ताऱ्यांचे बेट’ हा चित्रपट १५ एप्रिल रोजी मुंबई, ठाणे, रायगडसह पुण्यात प्रदर्शित होतोय. किरण यज्ञोपवीत दिग्दर्शित ‘ताऱ्यांचे बेट’ या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर, शोभा कपूर यांच्या ‘बालाजी मोशन पिक्चर्स’ च्या ‘ऑल्ट एन्टरटेन्मेंट’ आणि नीरज पांडे, शीतल भाटिया यांच्या ‘फ्रायडे फिल्म वर्क्‍स’ या निर्मिती संस्थांनी संयुक्तपणे केली आहे. ‘ताऱ्यांचे बेट’ या चित्रपटाची कथा साधी पण नर्म विनोदी आहे. नाटक आणि चित्रपट या माध्यमांची उत्तम जाण असलेले किरण यज्ञोपवीत, सौरभ भावे आणि शैलेश दुपारे यांचे लेखन असलेल्या ‘ताऱ्यांचे बेट’ मध्ये सचिन खेडेकर, अश्विनी गिरी, किशोर कदम, विनय आपटे, शुभांगी जोशी, जयवंत वाडकर, शशांक शेंडे तसेच बाल कलाकार इशान तांबे आणि अस्मिता जोगळेकर आदी कलावंतांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘ताऱ्यांचे बेट’ मध्ये श्रीधर सुर्वे या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या ग्रामसेवकाच्या जीवनप्रवासाची अत्यंत खुमासदार कथा आहे. श्रीधर सुर्वे, त्याची पत्नी इंदू, आई, मुलगी मीरा आणि मुलगा ओंकार असे हे पाचजणांचे छोटेखानी कुटुंब मुंबईपासून दूर असलेल्या कोकणातल्या अतिशय निसर्गरम्य खेडय़ात सुखासमाधानाने राहात असते. मध्यमवर्गातले कुटुंब, त्यांची बेतासबात अशी असलेली आर्थिक परिस्थिती, एकीकडे तुटपुंजे वेतन आणि दुसरीकडे वाढत्या महागाईला तोंड देण्याची तारेवरची कसरत त्याला करावी लागते. असे असूनही आहे त्यात सुखासमाधानाने हे कुटुंब जगत असते.

श्रीधरला शासकीय कामानिमित्त मुंबईला ये-जा करावी लागत असते. एकदा तो त्याच्या बायको-मुलांना मुंबईत फिरायला नेतो. आणि एका गमतीशीर गोष्टीला येथूनच सुरुवात होते. पूर्वी कधीही शहर न पाहिलेल्या बालवयीन ओंकारला मुंबईचे वैभव पाहून कुतूहल वाटते. आपल्याला पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जावे, असा हट्ट तो वडिलांकडे करतो. ओंकारचा हट्ट पुरवणे श्रीधरसाठी तर अशक्यच असते. नंतर पुढे ओंकारला श्रीधर असे सांगतो की तू परीक्षेत पहिला आलास तर तुला पंचतारांकित हॉटेलमध्ये नक्की घेऊन जाईन, पण हे आव्हान ओंकार स्वीकारून झपाटल्यागत अभ्यासाला लागला आहे, असे पाहून श्रीधरला घाम फुटतो. मध्यमवर्गीय परिस्थिती स्वीकारून पुढे सरकणारा एका कुटुंबाचा प्रापंचिक प्रवास या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. स्वत:बरोबरच आपल्या मुलाबाळांनी पाहिलेली स्वप्नं, शहरी झगमगाटाबद्दल मुलाबाळांना वाटणारे आकर्षण, त्या स्वप्नांना आकार देण्यासाठी करावी लागणारी धडपड, त्या धडपडीतून पुढे येणारे विविध संदर्भ, यांचे खुसखुशीत आणि हलकेफुलके चित्रण या चित्रपटात दिसेल.

‘ताऱ्यांचे बेट’ ची कथा माणसाला नकळत बरेच काही सांगून जाते. वेगाने वाढत चाललेल्या चंगळवादाचे भीषण रूप काय असेल, याचे दर्शन तर यात होईलच पण त्याचबरोबर भावनिक नातेसंबंधांनी घट्ट बांधलेली अनेक वर्षांची असलेली आपली कुटुंबव्यवस्था या चंगळवादामुळे पूर्णत: ढासळण्याच्या मार्गावर आहे. याचा इशाराही यात मिळेल. याचबरोबर आपण वेळीच सावरलो नाही तर समाजव्यवस्थेमध्ये अराजकता निर्माण झाल्यासारखी परिस्थिती दिसायला लागल्याशिवाय राहणार नाही, असेही नकळतपणे सूचित होत असल्याचे लक्षात येईल. मराठीसाठी नवीन चित्रपटनिर्मिती संस्था, नवा दिग्दर्शक, अनुभवी कलाकार तंत्रज्ञांची टीम, नवा विचार, नवीन कल्पना असलेल्या ‘ताऱ्यांचे बेट’ या चित्रपटाने पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पटकथा लेखन आणि अभिनयासाठी असे दोन पुरस्कार मिळवले आहेत.  

आजच्या काळात जे चित्र दिसतंय त्या जागतिकीकरणाच्या रेट्यात शहरी जीवनच काय पण ग्रामीण जीवनही अगतिक होतंय. कोकणातल्या दुर्गम भागात असलेल्या अशाच एका अगतिक कुटुंबाची ही गोष्ट आहे. `ताऱ्यांचे बेट'चे चित्रीकरण, कोकणातल्या दापोली, आंजर्ले, केळशी तसेत मुंबईतील गेटवे, भाऊचा धक्का, नरिमन पॉइंट, हाजीअली, वरळी, पवई आदी परिसरात झाले असून एक तास पंचेचाळीक मिनीट कालावधीचा हा चित्रपट आहे. हा किरण यज्ञोपवीत यांच्यासाठी दिग्दर्शनाचा पहिला प्रयत्न म्हणून हा चित्रपट महत्त्वाचा होता. यात सचिन खेडेकर, अश्विनी गिरी सोबत किशोर कदम, विनय आपटे, शुभांगी जोशी, जयवंत वाडकर, शशांक शेंडे तसेच बाल कलाकार इशान तांबे आणि अस्मिता जोगळेकर आदी कलावंत या चित्रपटात आहेत. बालाजी मोशन पिक्चर्सची सहयोगी संस्था असलेल्या एकतू कपूरच्या ऑल्ट एन्टरटेन्मेंटने आणि नीरज पांडे, शीतल भाटिया यांच्या फ्रायडे फिल्म वर्क्स यांनी संयुक्तपणे `ताऱयांचे बेट' या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...