Monday, March 7, 2011

मटा सन्मान मानांकन पार्टी


अकराव्या रामबंधु मटा सन्मान २०११ची मानांकनं आहेत... या घोषणेसरशी अंधेरीच्या 'कोहिनूर कॉण्टिनेण्टल'चा हॉल दणदणून गेला. उत्सुकता ताणलेल्या या कार्यक्रमानंतर गप्पांचा फड जमवून, दंगामस्तीत 'शूट'चा ताण विसरून आणि डान्सफ्लोअरवर बेभान होत मध्यरात्रीपर्यंत सर्व जुने-नवे कलाकार हरवून गेले.

आजा नच ले 
मानांकनांनंतर बराच वेळ खाण्याचा आस्वाद घेतल्यानंतर सगळ्यांनीच आपला मोर्चा डान्स फ्लोअरकडे वळवला. चमचमत्या लाइट्सच्या प्रकाशात या तारेतारकांनी रात्री उशिरापर्यंत फ्लोअरवर धुमशान केलं. आपल्या नृत्यासाठी भारतभरात ओळखल्या जाणाऱ्या झेलम परांजपे यांनी विजय पाटकर आणि विजय कदम यांच्यासह बाल्या डान्सच्या वळणावर चार पावलं टाकली. अभिजीत खांडेकरही हातवारे करून सर्वांना चीअरअप करीत होता. तर माधवी कुलकर्णी, गौरी नलावडे आणि त्यांचा ग्रुप आपल्याच नादात मस्त एन्जॉय करत होता.

मध्यरात्रीपर्यंत डान्स मस्ती 
डान्स फ्लोअरला खरी रंगत चढली ती मृण्मयी देशपांडे, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री यांनी फ्लोअरचा कब्जा घेतल्यानंतर. 'अप्सरा आली...'च्या रंगमंचावर नाचत असल्याच्या अविर्भावातच मृण्मयीनं डान्स सुरू केला. आनंद आणि पुष्करही बेभान नाचत होते. उमेश कामत आणि प्रिया बापटकडेही सगळ्यांचंच लक्ष होतं. 'झेंडा'साठी नॉमिनेशन मिळाल्याच्या खुशीत संतोष जुवेकरनेही फेर धरला. रात्री दहानंतर सुरू झालेला ही डान्स मस्ती मध्यरात्रीपर्यंत सुरूच होती.

आप, मै और... 
मानांकनं जाहीर झाल्यानंतर सगळ्याच सेलिब्रिटिंनी पूल साइटकडे मोर्चा वळवला आणि गप्पांचा फड रंगला. विजय पाटकर आणि विजय कदम तेव्हाही परीक्षकांच्या नजरेतूनच मानांकनांविषयीच भरभरून बोलत होते. हा चचेर्चा अड्डा जमला होता स्टार्टर्स मांडलेल्या टेबलांच्या बाजूला.

इरसाल किस्से 
रात्री बऱ्याच उशिरा आनंद इंगळे, मृण्मयी देशपांडे, पुष्कर श्रोत्री, उमेश कामत, प्रिया बापट असा ग्रुप धम्माल करण्यात भान हरपून गेला होता. दर काही मिनिटांनी त्यांच्या बाजूने जोरजोरात हसण्याचे आवाज येत होते. कारण होतं आनंद इंगळे आणि त्याचे इरसाल किस्से. 'फू बाई फू'चा एक्सपीरिअन्स आनंदला या पाटीर्तही जोरदार साथ देऊन गेला.

रंगल्या मैफिली 
दुसऱ्या बाजूला अवधुत गुप्ते, पुष्कर श्रोत्री, संतोष जुवेकर अशा खाशा लोकांचं गुफ्तगू सुरू होतं. तिथेही मधेमधे हसण्याचे फवारे उडत होतेच. 'एक लफडं' आणि 'झेंडा'साठी मानांकन मिळालेला चिन्मय मांडलेकर, त्याची पत्नी, 'एक लफडं'चा म्युझिक डायरेक्टर मयुरेश माडगावकर, निर्माता आलाप भागवत आणि गायिका यशोदा बुधकर यांनी एक कोपरा पकडून आपली मैफल जमवली होती. त्या मैफिलीत आपल्या नाटकांमधल्या धम्माल किश्श्यांनी रंगत आणत होते विश्वास सोहनी. या पंचकाला नंतर काही काळ फुलवा खामकरचीही साथ मिळाली.

परीक्षक म्हणतात... 
परीक्षण करताना खरं तर खूप त्रास झाला. इतक्या कलाकृतींमधून तिघांची निवड करणं खूपच कठीण होतं. त्यात सगळ्यांनाच न्याय मिळाला पाहिजे आणि मुख्य म्हणजे कोणावरही अन्याय होऊ नये, याची काळजी आम्ही घेतली. - प्रमोद पवार 

सिनेमा पाहायला आवडत असल्यानं परीक्षण करणं सोपं गेलं. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विविध प्रकारचे सिनेमे पाहायला मिळाले. खूप चांगले प्रयोग बघायला मिळाले. मजा आली परीक्षण करताना... - अशोक राणे 

सिनेमा कसा पाहावा, हे या परीक्षणाच्या निमित्तानं पहिल्यांदा कळलं. चित्रपट कसा बनतो, हे प्रत्यक्षात इतके सिनेमे पाहिल्यानंतर व्यवस्थितच कळलं. सिनेमा बघण्याचा, त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाचा एक वेगळा अॅप्रोच कळला. - विजय पाटकर 

खूप वेगळा अनुभव होता. मी पहिल्यांदाच परीक्षण केलंय. पण खूप कठीण जॉब होता परीक्षण करणं. कोणावरही अन्याय होऊ नये ही जबाबदारी होती, दडपण होतं. पण खूप मजा आली. - किशोरी आंबिये 

परीक्षण करताना एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली. १०० कलावंत धरले, तर त्यातल्या ७५ कलावंतांना तांत्रिक अभिनय कसा करावा, हे शिकण्याची गरज आहे. एक व्यक्तिरेखा साकारताना त्या व्यक्तिरेखेचे अनेक पदर, पैलू अभिनेत्याने आपल्या अभिनयातून दाखवणं आवश्यक असतं. हे पैलू त्या-त्या कलाकाराने स्वत: शोधायचे असतात. या अभ्यासाची गरज आहे. - विजय कदम 

मीडियाची वाढ होतेय, तशीच त्या मीडियाच्या गुणवत्तेनुसार वेगवेगळ्या शोची पण वाढ होते. काही चॅनेल प्रेक्षकांना गृहित धरतात, तर काही असं न करता वेगवेगळे प्रयोग करत आहेत. समाजप्रबोधन हे मीडियाचं मुख्य काम आहे, असं मानलं तर वेगवेगळे प्रयोग करणारे चॅनेल्स उजवे ठरतात. कथाबाह्य मालिकांमध्ये परीक्षण करणं खूप कठीण होतं. पण यातून एक वेगळा अनुभवही मिळाला. - विजय तापस

परीक्षण करताना प्रामुख्याने जाणवलेल्या दोन बाबी म्हणजे, सगळे चित्रपट गुणवत्तेच्या निकषावर श्रेष्ठ नव्हते. आणि दुसरी म्हणजे खूपच कमी चित्रपटांत नृत्य होतं. इतर चित्रपटांत जे होतं त्याला नृत्य म्हणणं कठीण होतं. पण 'मटा सन्मान'सारख्या पुरस्कारासाठी परीक्षण करण्याची संधी मिळाली याचा खूप आनंद आहे. - झेलम परांजपे 

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...