Saturday, February 26, 2011

मराठी नाटक जास्वंदी


 ’जास्वंदी' हे नाटक मराठी नाटकांच्या परंपरेत हटकून आठवावं असं. सत्तरच्या दशकात 'कलावैभव' या मातब्बर संस्थेने सादर केलेलं हे नाटक लिहिलं होतं सई परांजपे यांनी आणि त्याच्या दिग्दर्शिका होत्या विजया मेहता. प्रमुख भूमिकेतही त्याच. नाटकात माणसं आणि दोन बोके. नाटक माणसांइतकंच बोक्यांचंही. व्यावसायिक रंगभूमीची चाकोरी सोडून केलेला हा प्रयोग तेव्हा खूप गाजला होता. आता हेच नाटक पुन्हा रंगभूमीवर येतंय. निर्मिती संस्था आहे 'महाराष्ट्र रंगभूमी' आणि यावेळी दिग्दर्शन करताहेत स्वत: सई परांजपे. जुनी नाटकं नव्याने करून बघण्याच्या अलीकडच्या प्रयत्नांत हे नवी 'जास्वंदी' आगमनाआधीच लक्ष वेधून घेते आहे. वयाच्या सत्तरीतही अदम्य उत्साहाने तालमी करणाऱ्या सई परांजपे तरुण पिढीच्या कलावंतांनाही चकित करत आहेत. निर्माते संतोष कोचरेकर 'हा डाव आपण जिंकणार!' अशा ठोक आत्मविश्वासाने निमिर्तीप्रक्रियेत गुंतले आहेत.

'विजयाने केलेला प्रयोग सुंदर होत असला तरी मला तो समाधान देऊन गेला नव्हता. आमचे नाटकाच्या शेवटाबाबत मतभेद झाले होते. विजयाने तिला हवा तोच शेवट केला. त्या नाटकाचं ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी परीक्षण लिहिलं तेव्हा 'विजया मेहतांचा जय सई परांजपेंचा पराजय' असं हेडिंग दिलं होतं. आता मात्र मी माझा शेवट करणार आहे.' सई परांजपे गतस्मृतींना उजाळा देत म्हणाल्या.

विजयाबाईंनी हे नाटक मराठीत केलं तरी हिंदीत सुषमा सेठना प्रमुख भूमिकेत घेऊन सईंनीच दिल्लीत केलं होतं. गुजरातीत तरला मेहता प्रमुख भूमिकेत होत्या. सिंधीतही 'जास्वंदी' 'पंजे' या नावानं झालं.

यावेळी नव्या 'जास्वंदी'त सारिका निलाटकर-नवाथे प्रमुख भूमिकेत आहे. सई म्हणाल्या, 'सोनाच्या भूमिकेसाठी आम्ही बराच शोध घेतला. अनेक नावं सुचवली गेली, पण कुठलंच फूल उमललं नाही. शेवटी ही सारिका उगवली. ती तालमीत मला जे रिझल्ट्स देतेय त्याने मी खूप खुश आहे. नाटकातली ड्रायव्हरची भूमिका यापूवीर् अनेक कलाकारांनी केली, पण आज कोणीही माझ्या लक्षात नाही. पण आता आनंद अलकुंटे ही भूमिका ज्या पद्धतीने करतोय त्याने मी थक्क झालेय. सनी भूषण आणि अजय जाधव हे नाटकातले दोन बोके रोज नवं काहीतरी करुन मला चकित करतात.'

याशिवाय साहील आणि स्वाती बोवलेकर हे कलावंतही नाटकातल्या महत्त्वाच्या भूमिका साकारताहेत. राहुल रानडे संगीताची बाजू सांभाळताहेत. सईंच्या बरोबर काम करताना सर्व कलाकार खुश आहेत. शिस्तीत चालणाऱ्या तालमी, बुजूर्ग असूनही कुठलीही नवी गोष्ट नीट ऐकून घेऊन पटली तर तिचा स्वीकार करणारी दिग्दशिर्का आणि अभिनयाला आव्हान देणाऱ्या व्यक्तिरेखा असा भाग्य आम्हाला एरवी कधी मिळणार, असा तेच प्रश्न करतात आणि आपलीही नाटकाबद्दलची उत्सुकता वाढवतात.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...